(मोताळा लाईव्ह ) जिल्ह्यात सुशासन सप्ताहांतर्गत ‘प्रशासन गांव की ओर’ मोहीम राबविण्यात येत आहे. *’सुशासन सप्ताह’ ही अभिनव उपक्रम राबविण्याची संधी असून या संधीतून शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहचवा, असे निर्देश प्र.जिल्हाधिकारी सदाशीव शेलार यांनी विभाग प्रमुखांना दिले.
सुशासन सप्ताहांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयातील जिजाऊ सभागृहात जिल्हास्तरीय कार्यशाळा सोमवारी संपन्न झाली. या कार्यशाळेला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश इंगळे, उपजिल्हाधिकारी समाधान गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी जयश्री ठाकरे यांचेसह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
नागरिकांना शासनाच्या सेवा सहज व सोप्या पद्धतीने उपलब्ध होण्यासाठी प्रशासनातील इतर विभागांनी देखील अभिनव उपक्रम राबवावे. आपल्या विभागांतर्गत अभिनव उपक्रम राबविण्यासाठी सुशासन सप्ताह ही एक संधी आहे. या संधीतून शासनाच्या सेवांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या फॅार्म, रिफॅार्म, परफॅार्म आणि ट्रांसफॅार्म या चतु:सूत्रीचा प्रशासनात अवलंब करावा. आपल्या विभागाशी संबंधित ॲानलाईन व ॲाफलाईन पद्धतीने प्राप्त झालेल्या तक्रारी तातडीने निकाली काढाव्यात, असे निर्देश प्र. जिल्हाधिकारी यांनी सर्व विभाग प्रमुखांना दिले.
या कार्यशाळेत मोताळा तालुक्यातील वरुड येथील अटल भूजल योजनेंतर्गत झालेली उल्लेखनीय कामे, जिगांव प्रकल्प कार्यालयाकडून प्रकल्पग्रस्तांनी पुरविल्या जाणाऱ्या डिजिटल सेवा, चिखली तहसिल कार्यालयाला प्राप्त झालेल्या आयएसओ मानांकन आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयाद्वारे राबविण्यात येणाऱ्या प्रकृती परीक्षण सारख्या अभिनव उपक्रमांचे सादरीकरण अधिकाऱ्यांनी केले.