मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती प्रलंबीत अर्ज महाविद्यालयांनी 24 जानेवारीपर्यंत निकाली काढावेत

16

माहिती व तंत्रज्ञान विभागाने विकसीत केलेल्या महाडिबीटी पोर्टलवरून सामाजिक न्याय व विशेष विभागामार्फत विविध योजना महाडीबीटी प्रणालीव्दारे राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत नोंदणीकृत झालेल्या अनुसूचित जाती प्रवर्गातील शिष्यवृत्ती आवेदनपत्र विविध महाविद्यालयस्तरावर मोठ्या प्रमाणात प्रलंबित आहे. महाविद्यालयास्तरावर प्रलंबित असलेले सर्व पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज दि. 24 जानेवारी 2025 पर्यंत तातडीने निकाली काढावे, असे सूचना समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त भाऊराव चव्हाण यांनी दिले.

महाडिबीटी पोर्टलवर अनुसूचित जाती प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांकरीता भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृती, मॅट्रिकोत्तर शिक्षण फी परिक्षा फी प्रदाने, राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृती योजना, व्यावसाय पाठयक्रमाशी संलग्न वसतीगृहातील विद्यार्थ्यांना विद्यावेतन व व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना राबविण्यात येत आहे.

अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी सन 2024-25 या शैक्षणिक वर्षातील नवीन व नूतनीकरणाचे अर्ज नोंदणीकृत करण्यासाठी दि. 25 जुलै 2024 पासुन https://mahadbt.maharashtra.gov.in या महाडीबीटी संकेतस्थळावर माहिती तंत्रज्ञान विभागाकडून सुरू करण्यात आलेले आहे. परंतु सन 2024-25 या शैक्षणिक वर्षाचे महाडीबीटी पोर्टलवरील डॅशबोर्डच्या सद्यस्थितीचे अवलोकन केले असता अनुसूचित जाती प्रवर्गाचे एकूण 9 हजार 255 अर्ज आजमितीस भरण्यांत आलेले महाविद्यालय स्तरावर दिसून येत आहे. महाडिबीटी प्रणालीवर सन 2024-25 करिता अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करुन सहा महिने होवुनही संपूर्ण सत्रातील सरासरीच्या तुलनेत भरलेल्या अर्जांचे प्रमाण अत्यल्प आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीकरिता महाविद्यालयाकडुन कोणतेही प्रयत्न सुरु असल्याचे दिसून येत नसून विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज भरण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसुन येत आहे.

अनुसूचित जाती विद्यार्थ्यांची महाडीबीटी प्रणालीवर महाविद्यालय स्तरावर प्रलंबित असलेले सर्व पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज निकाली काढण्यात यावी. महाडीबीटी प्रणालीवर महाविद्यालय स्तरावर विद्यार्थ्यांची प्रलंबित असलेले अर्ज निकाली काढण्याची जबाबदारी संबंधित महाविद्यालयीन प्राचार्य यांची आहे. महाविद्यालय स्तरावर प्रलंबित असलेले अर्ज प्रचलित शासन निर्णयानुसार पडताळणी करून सर्व पात्र अर्ज मंजूर करण्यात यावी. महाविद्यालय स्तरावर प्रलंबित अर्ज राहणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. सन 2023-24 व 2024-25 या शैक्षणिक वर्षातील महाविद्यालय स्तरावर प्रलंबित असलेले अर्ज मंजूर करून आयुक्तालयास पाठविण्यात न आल्यामुळे आयुक्तालयास शिष्यवृत्ती वितरणाची पुढील कार्यवाही करता येणार नाही. त्याचप्रमाणे आपल्या महाविद्यालयात प्रवेशित योजनेस पात्र असलेल्या अनुसूचित जाती प्रवर्गातील सर्व विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज महाडीबीटी संकेतस्थळावर भरून घेण्याची तात्काळ कार्यवाही करण्यात यावी. तशा सूचना कार्यशाळा घेऊन सर्व संबंधित मागासवर्गीय विद्यार्थ्यांना देण्यात याव्यात. जेणेकरून पात्र मागासवर्गीय विद्यार्थी महाडीबीटी प्रणालीवर आवेदनपत्रे भरण्यापासून वंचित राहणार नाही याची दक्षता संबंधित प्राचार्य यांनी घ्यावी, असे आवाहन सहाय्यक आयुक्त यांनी केले आहे.