[मोताळा लाईव्ह ] दिव्यांग तसेच राष्ट्रीय वयोश्री योजनेतंर्गत नागरिकांना गरजेनुसार आवश्यक असलेले साहित्य मोफत उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारच्यावतीने प्रधानमंत्री दिव्याशा केंद्र बुलढाणा येथे सुरू करण्यात येत आहे. या केंद्राचे लोकार्पण 27 जानेवारीला केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते होणार असून मुंबई, नागपूर नंतर राज्यातील तिसरा केंद्र बुलढाणा जिल्ह्यात सुरू होत आहे.
केंद्र सरकारच्यावतीने दिव्यांग बांधवांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. या योजनेअंतर्गत दिव्यांगाना आवश्यक असलेले उपकरणे, साहित्य मोफत सहज आणि कमी वेळेत उपलब्ध व्हावेत या दृष्टिकोनातून केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाच्यावतीने प्रधानमंत्री दिव्याशा केंद्र सुरू करण्यात आली आहे.
देशात आतापर्यंत 67 केंद्र कार्यान्वित करण्यात आली आहेत. महाराष्ट्र राज्यामध्ये मुंबई, नागपूर नंतर आता बुलढाणा शहरामध्ये प्रधानमंत्री दिव्याशा केंद्र सुरू होत आहे. 27 जानेवारीला दुपारी 12 वाजता केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते या केंद्राचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा बुलढाणा शहरातील धाड रोड स्थित असलेल्या अपंग निवासी शाळा आणि पुनर्वसन केंद्र येथे होणार आहे. प्रधानमंत्री दिव्याशा केंद्राच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांना अत्यावश्यक असलेले साहित्य मोफत देण्यात येते. तसेच राष्ट्रीय योजनेअंतर्गत दारिद्र रेषेखालील वयोवृद्ध नागरिकांना त्यांच्या आवश्यकतेनुसार साहित्यही या केंद्रातून देण्यात येते प्रधानमंत्री दिव्याशा केंद्र भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम अर्थात ( एलिम्को ) त्यांच्या साह्याने बुलढाणा शहरात सुरू करण्यात आले आहे. या केंद्रातून मिळणाऱ्या साहित्याचा लाभ गरजू दिव्यांग आणि वयोवृद्ध नागरिकांनी घ्यावा असे आवाहन बुलढाणा जिल्हा प्रशासन आणि दिव्यांग कल्याण व पुनर्वसन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.