महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये अल्पसंख्यांक युवा-युवतींसाठी भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र तात्काळ सुरु करा – वसीम कुरेशी यांची मागणी

71

[मोताळा लाईव्ह] महाराष्ट्रातील अल्पसंख्यांक समाजातील युवक व युवतींना पोलीस, आर्मी भरतीसह विविध शासकीय सेवांमध्ये संधी मिळावी, त्यांची शारीरिक व बौद्धिक तयारी योग्य पद्धतीने व्हावी यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये मोफत रेसिडेन्शियल भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रे तात्काळ सुरू करण्यात यावीत, अशी ठाम मागणी मार्टी कृती समितीचे राज्य सरचिटणीस अॅड. वसीम बिस्मिल्लाह कुरेशी यांनी केली आहे.

या मागणीसंदर्भातील सविस्तर निवेदन अल्पसंख्यांक विकास विभाग मंत्रालय मुंबई व महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोग, मुंबई यांना ई-मेल व व्हॉट्सअ‍ॅप च्या माध्यमातून पाठविण्यात आले आहे.

अल्पसंख्यांक विकास विभागाच्या 2016 च्या शासकीय निर्णयाचा हवाला देत अॅड. वसीम कुरेशी यांनी या प्रशिक्षणामध्ये पोलीस, आर्मी, एमपीएससी, यूपीएससी, बँकिंग, रेल्वे, एसएससी इत्यादी सर्व शासकीय सेवा परीक्षांची तयारी मोफत करून देण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

तसेच प्रशिक्षण केंद्रात निवास, भोजन, शारीरिक प्रशिक्षण व लेखी अभ्यासाची सुविधा मोफत असावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

राज्यातील अल्पसंख्यांक समाजातील युवांना हक्काचे मार्गदर्शन व संधी मिळावी, यासाठी शासनाने तात्काळ निर्णय घेणे गरजेचे आहे, असे मत अॅड. वसीम कुरेशी यांनी व्यक्त केले आहे.