धामणगाव बढे येथील बांधकाम कामगारांना योजनेच्या लाभासाठी तात्काळ सह्या द्या… अड वसीम कुरेशी

22

Motala live  गोरगरीब बांधकाम कामगारांना शासनाच्या बांधकाम व अन्य कामगार कल्याण मंडळाच्या विविध योजनांचा तात्काळ लाभ मिळावा यासाठी ग्रामपंचायत स्तरावर आवश्यक सह्या विलंब न करता करून द्याव्यात, अशी मागणी अ‍ॅड. वसीम कुरेशी यांनी केली आहे.

ग्रामपंचायत अधिकारी यांच्या मार्फत पंचायत समिती मोताळा येथील गटविकास अधिकारी यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नवीन नोंदणी (New Registration) तसेच नूतनीकरण (Renewal) प्रक्रियेसाठी पात्र बांधकाम कामगारांना आवश्यक कागदपत्रांवर ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या सह्या अपरिहार्य आहेत. मात्र या प्रक्रियेत होणाऱ्या विलंबामुळे गोरगरीब जनता शासनाच्या कल्याणकारी योजनांपासून वंचित राहते.

यासाठी ग्रामपंचायत अधिकारी संघटनेलाही स्पष्ट सूचना देऊन कामगारांच्या अर्ज व कागदपत्रांवर तात्काळ सह्या करून द्याव्यात, अशीही मागणी करण्यात आली आहे. शासनाच्या या योजनेत कोणताही विलंब न होता लाभ मिळावा यासाठी पंचायत समिती प्रशासनाने काटेकोर दक्षता घ्यावी, असे निवेदनात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.