( मोताळा लाईव्ह ) बुलढाणा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारी यांच्या आदेशान्वये एका पथकाने जिल्ह्यात तीन ठिकाणी पीसीएनडीटीच्या कायद्यान्वये कारवाई केल्या आहेत. त्यात नांदुरा, मेहेकर व रिसोड या ठिकाणी रेड टाकत दोषी आढळल्याने सोनोग्राफी मशीन्स सील केल्या आहेत. तसेच काल एका महिलेचा पाठलाग करत वाशिमच्या रिसोड येथील शिव मुळव्याध हॉस्पिटल आणि प्रसूती गृह केंद्रावर अवैधरित्या गर्भपात केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथे गर्भलिंग चाचणी केल्यानंतर रिसोड येथे गर्भपात होत असल्याची माहिती आरोग्य पथकांना मिळाली होती. त्यानंतर बुलढाणा, वाशिम आणि रिसोड येथील संयुक्त कारवाई दरम्यान गर्भपातासाठी वापरल्या जाणारे औषधे आणि साहित्य जप्त करण्यात आले आहे. घटनास्थळी डॉ. अमोल भोपाळे उपस्थित असल्याने त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा शल्यचिकित्सक यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाचा तपास सुरू असून मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणात अधिक आरोपी असण्याची शक्यता असून पुढील तपास सुरू आहे.