मोताळा लाईव्ह } : डिजीटल इंडिया भूमी अभिलेख आधुनिकरण कार्यक्रमांतर्गत शेतकरी व नागरिकांसाठी शेतजमिनीसंदर्भातील 11 प्रकारचे फेरफार नोंदी ऑनलाईन करण्याची सुविधा ई-हक्क प्रणालीव्दारे उपलब्ध करुन दिली आहे. या प्रणालीद्वारे नागरिक व शेतकऱ्यांना शेतजमीनीचे फेरफार नोंदी करणे सुलभ होणार असून ई-हक्क प्रणालीचा जास्तीत जास्त लाभ शेतकरी व नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.
सर्वसामान्य नागरिकांना वेगवेगळया सेवांसाठी शासकीय कार्यालयामध्ये जाऊन कागदपत्र सादर करावे लागतात. नागरिकांचा हा त्रास कमी व्हावा आणि त्यांना कालर्यादेत नोंदी उपलब्ध होण्यासाठी शासनाने ई-हक्क प्रणाली कार्यान्वित केली आहे. या प्रणाली व्दारे विविध प्रकारच्या 11 प्रकारचे फेरफार नोंदीसाठी ऑनलाईन सुवधिा उपलब्ध करुन दिली आहे. नागरिकांना या सेवेचा लाभ घेण्यासाठी pdeigr.maharashtra.gov.in/frmLogin या संकेतस्थळावर जाऊन आपली नोंदणी करावी लागते. संकेतस्थळावर गेल्यानंतर नोंदणीची सुविधा उपलब्ध आहे. तेथे जाऊन नोंदणी केल्यानंतर युजर आयडी व पासवर्ड टाकून विहीत माहिती भरावी.
ई-हक्क प्रणालीवर ई-करार नोंदी, बोजा चढविणे/गहाण्खत, बोजा कमी करणे, वारस नोंद, मृतांचे नाव कमी करणे, अ.पा.क. शेरा कमी करणे,ए.कु.मे. नोद कमी करणे, विश्वस्तांचे नाव बदलने, खातेदाराचे माहिती भरणे, हस्तलिखित व संगणीकृत सातबारामध्ये तफावत दुरुस्ती करणे व मयत कुळाची वारस नोंद अशा 11 प्रकारच्या फेरफार सुविधा शेतकऱ्यांना करता येईल. अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी आपले संबंधित तहसिलदार, मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी यांचे कार्यालयास संपर्क साधावा.