दहावी व बारावी विद्यार्थ्यांचे ग्रेस गुण अर्ज आपले सरकार पोर्टलवरच ऑनलाईन स्विकारले जाणार

29

{मोताळा लाईव्ह } दहावी व बारावी विद्यार्थ्यांचे ग्रेस गुण अर्ज शासनाच्या आपले सरकार प्रणालीद्वारे केवळ ऑनलाईन पद्धतीने स्विकारण्याबाबत क्रीडा आयुक्त सुचित केले आहे. जिल्ह्यातील सर्व खेळाडू, विद्यार्थी, माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी आपले सरकार पोर्टलवर या वर्षीपासून सवलत गुणांचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी बि.एस.महानकर यांनी केले आहे.

सन 2023-24 पर्यंतची ग्रेस गुण प्रक्रिया काही मानवी उणीवांमुळे हे काम अचुक व दोषरहीत होणे क्लिष्ट होत होती व त्याचा फटका विद्यार्थ्यांना त्यांच्या गुण न मिळण्याने बसत होता. या प्रश्नावर तोडगा आणि सदर सवलत गुण प्रक्रिया निर्दोष करण्यासाठी, या वर्षीपासून म्हणजेच 2024-25 यावर्षापासून ग्रेस गुणांसाठी केली जाणारी प्रक्रिया शासनाच्या आपले सरकार पोर्टलद्वारे ऑनलाईन करण्यात आली आहे. तसेच सदर पोर्टलद्वारे सर्व अर्ज ऑनलाईन प्रणालीद्वारेच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्याकडे सादर करण्याची सुविधा निर्माण करुन देण्यात आली आहे.

त्याअनुषंगाने बुलढाणा जिल्ह्यातील सर्व खेळाडू विद्यार्थी / जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय यांनी आपले सरकार अॅपद्वारे या वर्षीपासून सवलत गुणांचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरावयाचा आहे. त्यासंदर्भात कोणताही खेळाडू जिल्हा क्रीडा कार्यालय, बुलढाणा येथे ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करणार नाही व अशा प्रकारचा अर्ज जिल्हा क्रीडा कार्यालय, बुलढाणा यांचेकडून स्विकारल्या जाणार नाही याची नोंद बुलढाणा जिल्ह्यातील सर्व खेळाडू, विद्यार्थी, माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.