फडणवीस म्हणतात सातबारा कोरा, अजितदादा म्हणतात पैसे भरा… क्रांतीकारी शेतकरी संघटना आक्रमक…. चिखलीत सरनाईक-राजपुतांसह शेतकर्‍यांची निदर्शने

16
[मोताळा लाईव्ह ] आपले सरकार आल्यास शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करु असे आश्‍वासन महायुतीच्या वतीने शेतकर्‍यांना निवडणुकीपूर्वी देण्यात आले होते. नवीन सरकारच्या पहिल्याच अर्थसंकल्पात शेककर्‍यांना पूर्ण कर्जमाफीची अपेक्षा होती, मात्र नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात त्याबाबत घोषणा तर झालीच नाही उलट अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी शेतकर्‍यांना पीककर्जाची थकबाकी भरण्याचा सल्ला दिल्याने शेतकर्‍यांमध्ये संभ्रमाची अवस्था निर्माण झाली असून शासनाप्रती रोष उत्पन्न झाला आहे. कर्जमाफीची अपेक्षा असलेल्या शेतकर्‍याला सद्या सर्वच बँका कर्जवसुलीसाठी तगादा लावत असल्याने शेतकर्‍यांचा जीव मेटाकुटीला आला आहे.
याविरोधात आज चिखलीतील जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेसमोर शेतकर्‍यांनी निदर्शने करत आंदोलन केले. जोपर्यंत ना.फडवणीसांनी दिलेला शब्द पाळून शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करावा अशी मागणी करीत कर्जमाफी होत नाही तोवर आम्ही पैसे भरणार नाही अशी भुमिका काही शेतकर्‍यांनी घेतली आहे. तर अनेक शेतकरी बँकांच्या सक्तीला बळी पडून पैसे देखील भरत आहेत. अशाप्रकारे शब्द देवून फिरविणार्‍या सत्ताधार्‍यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा अशी उद्विग्न मागणीही यावेळी शेतकर्‍यांनी केली आहे. आंदोलनादरम्यान ‘‘फडणवीस साहेब म्हणतात सातबारा कोरा, अजितदादा म्हणतात पैसे भरा’’ अशी जोरदार घोषणाबाजी शेतकर्‍यांनी केली.  या आंदोलनामध्ये शेतकर्‍यांसह क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे विनायक सरनाईक, नितिन राजपुत, संतोष शेळके, रमेश कुटे, ज्ञानेश्वर मोरे,गजानन वाघ, राजेंद्र इगळे, भागवत वाघ, नागोराव लंबे, संदिप वाघ यांच्यासह असंख्य शेतकरी उपस्थित होते.
सक्तीने वसुली केल्यास तिव्र आंदोलन : विनायक सरनाईक
उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी कर्ज भरण्याचा सल्ला शेतकर्‍यांना दिल्यापासून बँका कर्जवसुलीसाठी तगादा लावत आहेत. अनेकांचे खाते होल्ड केले आहे तर गावागावात येऊन बँकांकडून  सरकारच्या नावावर सक्तीची वसूली होत आहे. या सक्तीच्या वसूलीविरोधात तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सरनाईक यांनी दिला आहे.