बुलढाण्यात उद्योजकांसाठी ‘सस्टेनेबिलिटी’, ‘व्यवसाय सुलभता’ व नियम शिथिलीकरण’ विषयांवर कार्यशाळा संपन्न

43

[मोताळा लाईव्ह ] जिल्ह्यातील उद्योजकांसाठी ‘सस्टेनेबिलिटी’, ‘व्यवसाय सुलभता’ तसेच डी रेग्युलेशन नियम शिथिलीकरण या महत्त्वपूर्ण विषयांवर एकदिवसीय कार्यशाळा येथील नर्मदा हॅाटेलच्या सभागृहात गुरुवारी यशस्वीरीत्या आयोजित करण्यात आली. मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर, पुणे यांच्यावतीने आयोजित या कार्यक्रमात बुलढाणा जिल्ह्यातील ६० उद्योजकांनी सक्रिय सहभाग घेतला.

कार्यशाळेचे उद्घाटन सत्र अत्यंत माहितीपूर्ण ठरले. पुणे येथील राईस एन्टरप्रासेस चे प्रकल्प प्रमुख योगेश जोशी यांनी ‘सस्टेनेबिलिटी’ (शाश्वतता) या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी ऊर्जा संवर्धन, अक्षय ऊर्जा आणि अपारंपरिक ऊर्जा, तसेच हरित ऊर्जा व हरितगृह वायू या संकल्पना स्पष्ट केल्या. याव्यतिरिक्त, त्यांनी कचरा व्यवस्थापन, प्रदूषण आणि लीन मॅन्युफॅक्चरिंगच्या माध्यमातून शाश्वतता कशी साध्य करता येते, यावर भर दिला. उद्योगाच्या बजेटिंगच्या महत्त्वावरही त्यांनी प्रकाश टाकला.

उद्योग मित्र कन्सल्टन्सी प्रा. लि., नवी मुंबईचे इंजिनिअर प्रितेश भेदे यांनी ‘गव्हर्मेंट ई-मार्केटप्लेस पोर्टल’ वर नोंदणी कशी करावी आणि सरकारी निविदा कशा तयार कराव्यात, याबाबत सविस्तर आणि उपयुक्त माहिती दिली. यामुळे उद्योजकांना शासकीय खरेदी प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी मिळेल.

याप्रसंगी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक प्रमोद लांडे यांनी नियम शिथिलीकरण (डीरेग्युलेशन) या विषयावर विस्तृत सादरीकरण केले. त्यांनी शासनाचे नवीन धोरणे आणि नियम उद्योजकांना व्यवसाय करणे कसे सोपे करत आहेत, याबाबत माहिती दिली. तसेच उपस्थित उद्योजकांशी थेट संवाद साधून त्यांच्या शंकांचे निरसन केले.

व्यवस्थापक सुनील पाटील यांनी महाराष्ट्र शासनाच्या ‘मैत्री पोर्टल’ माहिती दिली. हे पोर्टल उद्योजकांना विविध परवानग्या आणि नोंदण्या एकाच ठिकाणी मिळवण्यासाठी कसे उपयुक्त आहे, याची त्यांनी माहिती दिली.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी एमसीसीआयए, पुणे येथील संतोष सावंत आणि प्रणय चोपडेकर यांनी विशेष प्रयत्न केले.

समारोपप्रसंगी, उपस्थित मान्यवर आणि सहभागी उद्योजकांचे आभार प्रदर्शन करण्यात आले.