आयुर्वेदाला बळकटी देण्यासाठी राज्यनिहाय आराखडे व मानक कार्यपद्धती तयार करणार … आयुषमंत्री प्रतापराव जाधव ….

18

Motala live : आयुर्वेदाला अधिक बळकट करण्यासाठी राज्यनिहाय आराखडे व मानक कार्यपद्धती (SOPs) तयार करणे गरजेचे असल्याचे मत केंद्रीय आयुष ( स्वतंत्र प्रभार )आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केलाय नवी दिल्ली येथील सरिता विहार येथे अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेत आयोजित ‘राष्ट्रीय आयुष अभियान आणि राज्यांतील क्षमता विकास’ या विभागीय परिषदेचे उद्घाटन आज 3 सप्टेंबरला झाले त्यावेळी अध्यक्ष भाषणात आपलं मनोगत व्यक्त करताना केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव बोलत होते
या दोन दिवसीय शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमाला निती आयोगाचे सदस्य डॉ. विनोद कुमार पॉल आणि आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा उपस्थितीत होते केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव पुढे म्हणाले की राज्यनिहाय गरजांनुसार सशक्त आणि सर्वसमावेशक आरोग्य आराखडा उभारण्याच्या सरकारच्या बांधिलकीवर भर दिला आहे देशभरातील आरोग्यसेवा अधिक प्रभावी करण्यासाठी सर्वसमावेशक मानक कार्यपद्धती (SOPs) विकसित करण्याच्या सरकार प्रयत्न करत आहे . “आमचे उद्दिष्ट म्हणजे राज्यनिहाय आराखडे तयार करणे, सर्वसमावेशक SOPs विकसित करणे, उत्तम आरोग्य पायाभूत सुविधा उभारणे, लोकांना दर्जेदार सेवा उपलब्ध करून देणे आणि आयुष पद्धतीचे आधुनिक आरोग्य व्यवस्थेशी एकात्मिकरण सुनिश्चित करणे आहे.”
पंतप्रधानांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली २०१४ मध्ये सुरू झालेल्या राष्ट्रीय आयुष अभियानाच्या प्रगतीचा आढावा घेताना, प्रतापराव जाधव यांनी या अभियानाने परवडणाऱ्या आणि सर्वसमावेशक आयुष आरोग्यसेवेत मोठी प्रगती साधल्याचे नमूद केले. त्यांनी विशेषतः देशभरात उभारण्यात येणाऱ्या १२,५०० आयुष्मान आरोग्य मंदिरांच्या परिवर्तनकारी उपक्रमावर भर दिला. यामुळे ओपीडी-आधारित सेवांपासून सर्वसमावेशक सेवा वितरण मॉडेलकडे झालेला मूलभूत बदल अधोरेखित झाला असून प्रतिबंधात्मक व प्रोत्साहनात्मक आरोग्यसेवेवर यामध्ये विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.
ते पुढे म्हणाले की, ४ मार्च २०२४ रोजी आयुष मंत्रालयाने आयुष आरोग्यसेवा संस्थांसाठी ‘इंडियन पब्लिक हेल्थ स्टँडर्ड्स’ (IPHS) सुरू केले. हे मानदंड निती आयोग आणि आरोग्य सेवा महानिदेशालय (DGHS) यांच्या सल्लामसलतून विकसित करण्यात आले असून, आयुष क्षेत्रातील पायाभूत सुविधा, मानव संसाधन, क्षमता विकास, औषधे, गुणवत्ता हमी, नैदानिक चाचण्या आणि ब्रँडिंग या सर्व बाबींमध्ये एकसमानता व दर्जा सुनिश्चित करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.

प्रतापराव जाधव यांनी AIIA येथे ‘आयुर्विद्या ॲडव्हान्स्ड सेंटर’चे केले उद्घाटन…आयुर्वेद शिक्षण आणि संवाद यासाठी समर्पित असा एक अग्रगण्य डिजिटल मंच. या केंद्राचा उद्देश म्हणजे तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालील अभ्यासक्रम, थेट वेबिनार्स आणि संवादात्मक सत्रांद्वारे आयुर्वेद शिक्षण सर्वांसाठी सहज उपलब्ध करणे. हा उपक्रम क्षमता विकास, सतत व्यावसायिक प्रगती आणि आयुष क्षेत्रातील नवकल्पनांना चालना देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल.
आयुष परिषदेच्या निमित्ताने उपस्थितांना संबोधित करताना निती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही. के. पॉल यांनी ‘सुदृढ भारत’ घडविण्यात आयुष क्षेत्राच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर भर दिला. त्यांनी नमूद केले की ही परिषद देशभरातील पारंपरिक आरोग्यव्यवस्था बळकट करण्यासाठी विविध भागधारक आणि राज्य सरकारांना एका व्यासपीठावर आणते. ते म्हणाले की, ‘विकसित भारत @2047’ या दृष्टीकोनाची पूर्तता फक्त निरोगी आणि उत्पादक जनतेमुळेच शक्य आहे. यावेळी त्यांनी अधोरेखित केले की, “आरोग्य हे राष्ट्रीय विकासाचे साधनही आहे आणि एक महत्त्वपूर्ण टप्पाही आहे.”
डॉ. पॉल यांनी नमूद केले की भारताने तीव्र आजारांवर मात करण्यामध्ये आणि एसडीजी उद्दिष्टे साध्य करण्यामध्ये महत्त्वपूर्ण प्रगती केली आहे. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली क्षयरोग, कुष्ठरोग, लिम्फॅटिक फिलॅरियासिस, गोवर, काळा आजार आणि रुबेला यांसारखे आजार निर्मूलन करण्यासाठी केंद्रित प्रयत्न केले जात आहेत. डॉ. पॉल यांनी आयुष आणि आधुनिक आरोग्यव्यवस्था या दोन्हींचा समावेश असलेल्या सर्वसमावेशक आणि एकात्मिक दृष्टिकोनातून सध्याची ७१ वर्षांची आयुर्मर्यादा वाढवून ८५ वर्षे किंवा त्याहून अधिक करण्याच्या महत्त्वावर भर दिला.
हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी त्यांनी काही महत्त्वाचे कृती-बिंदू मांडले, ज्यामध्ये राष्ट्रीय आयुष अभियान (NAM) ची अधिक प्रभावी अंमलबजावणी, आयुष वैद्यकीय शिक्षणाच्या पायाभूत सुविधांचे बळकटीकरण, वेलनेस व मेडिकल व्हॅल्यू टुरिझमचा प्रसार, तसेच आयुष क्षेत्रातील खासगी सहभाग आणि प्रशिक्षित मनुष्यबळाला प्रोत्साहन देणे यांचा समावेश आहे. त्यांनी आयुषला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि राष्ट्रीय आरोग्य परिणाम सुधारण्यासाठी सामूहिक आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांची गरज असल्याचे आवाहन केले.
सचिव वैद्य राजेश कोटेचा यांनी ‘हर घर आयुर्योग’ हा आयुष आणि योग यांचा संगम असलेला उपक्रम प्रत्येक घरापर्यंत पोहोचविण्याची गरज अधोरेखित केली, कारण तो निरोगी भारत घडविण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतो. ते पुढे म्हणाले की, सहा महत्त्वाच्या उपथीम्सभोवती उभारलेली ही दोन दिवसीय परिषद वर्तणूक बदलाच्या माध्यमातून या एकात्मिकरणाला गती देईल आणि आयुष धोरणांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात लक्षणीय योगदान देईल.
या परिषदेचा उद्देश राज्य/केंद्रशासित प्रदेशांच्या अधिकाऱ्यांकडून प्राप्त झालेल्या राज्यनिहाय नोंदी व अभिप्राय नोंदी, तसेच तळागाळातील सूचना यावर सविस्तर चर्चा करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा आहे. अशा प्रकारचा सहभागात्मक दृष्टिकोन राष्ट्रीय आयुष अभियान (NAM) अधिक बळकट करण्यासाठी आणि धोरणात्मकरीत्या विस्तारण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. हे अभियान आयुर्वेद, योग आणि निसर्गोपचार, युनानी, सिद्ध, सोवा-रिग्पा आणि होमिओपॅथी प्रणालींच्या एकात्मिकरणाद्वारे सर्वांगीण आरोग्यसेवा प्रोत्साहित करणारा एक महत्त्वाकांक्षी कार्यक्रम आहे.
उद्घाटन सत्राला आयुष मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव श्री. होवेदा अब्बास; संयुक्त सचिव सौ. कविता जैन आणि सौ. मोनालिसा दाश; उपमहानिदेशक श्री. सत्यजित पॉल; संयुक्त सचिव सौ. अलार्मेलमंगई डी; तसेच आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वरिष्ठ आर्थिक सल्लागार सौ. इंद्राणी कौशल्य उपस्थित होत्या.

23 सष्टेबरला आयुर्वेद दिन साजरा केला जाणार … प्रतापराव जाधव

यावर्षीपासून २३ सप्टेंबर हा दिवस ‘आयुर्वेद दिन’ म्हणून साजरा केला जाईल. यावर्षी या दिनाचा दहावा वर्धापन दिन असून त्याची थीम आहे – “जनतेसाठी आणि पर्यावरणासाठी आयुर्वेद”. ही थीम वैयक्तिक आरोग्यवृद्धीसोबतच पर्यावरणीय शाश्वततेची हमी देण्यात आयुर्वेदाचे महत्त्व अधोरेखित करत केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सक्रिय सहभाग घेण्याचे आणि आयुर्वेद दिनाला जागतिक आरोग्य उपक्रमाचे रूप देण्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
संस्थात्मक विकासाच्या दृष्टीने, आयुषसंबंधित विमा विषयांवर भागधारकांना सहाय्य करण्यासाठी अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेत (AIIA) प्रकल्प व्यवस्थापन प्रकोष्ठ (PMU) कार्यान्वित करण्यात आल्याची घोषणा मंत्री महोदय यांनी केली