Motala live : जिल्ह्यात अॅग्रिस्टॅक योजनेअंतर्गत शेतकरी माहिती संच निमिर्ती आणि शेतकऱ्यांचे शेतकरी ओळख क्रमांक (फार्मर आयडी) तयार करण्याची कार्यवाही सुरु आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जवळच्या नागरी सुविधा केंद्र (सीएससी) येथे नोंदणी करुन आपला फार्मर आयडी तयार करुन घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.
शेतकरी माहिती संच तयार करण्यासाठी प्रकल्पाची अंमलबजावणी जिल्ह्यात 12 डिसेंबर 2024 पासून कॅम्प मोडमध्ये तसेच 21 जानेवारी 2025 पासून नागरी सुविधा केंद्र आणि कॅम्प या हायब्रिड मोडव्दारे करण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यात 24 सप्टेंबरपर्यंत 4 लाख 46 हजार 522 शेतकऱ्यांचे शेतकरी ओळख क्रमांक (फार्मर आयडी) तयार करण्यात आले आहे.
जिल्ह्यात पी.एम. किसान योजनेचे एकूण 4 लाख 34 हजार 468 लाभार्थी आहेत त्यापैकी आजअखेर 3 लाख 27 हजार 628 लाभार्थ्यांचे शेतकरी ओळख क्रमांक (फार्मर आयडी) तयार करण्यात आले आहे. अद्यापपावेतो 1 लाख 6 हजार 840 शेतकऱ्यांचे शेतकरी ओळख क्रमांक तयार झालेले नाही. त्यामुळे या उर्वरित शेतकऱ्यांनी तात्काळ शेतकरी ओळख क्रमांक (फार्मर आयडी) तयार करुन घ्यावे अन्यथा आपल्याला पी.एम. किसान योजनेचा लाभ मिळणार नाही, असे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील सर्व संयुक्त खातेदार व समाईक खातेदार यांनी प्रत्येक सहधारकांचा शेतकरी ओळख क्रमांक (फार्मर आयडी) तयार करुन घ्यावा. या अॅग्रिस्टॅक योजनेंतर्गत शेतकऱ्यांना विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी आवश्यक असून शेतकरी ओळख क्रमांक (फार्मर आयडी) असेल तरच शेतकरी बांधवांना विविध योजनांचा लाभ वितरीत करण्यात येणार आहे. तसेच लाभार्थ्यांना वारंवार प्रमाणिकरणाची (ई-केवायसी) आवश्यकता राहणार नाही. अॅग्रीस्टॅक योजनेंतर्गत आपला सातबारा आधारला लिंक करायचा असून शेतकऱ्यांना एक फार्मर आयडी मिळेल. फार्मर आयडी बनवला नाही तर पीक विमा, पीक कर्ज, पीएम किसान व विविध पीक अनुदान यांचा लाभ मिळणार नाही.
फार्मर आयडीसाठी लागणारी कागदपत्रे
आधार कार्ड, मोबाईल क्रमांक जो आधारला लिंक केला असेल, मोबाईल क्रमांक बँक खात्याशी लिंक असावा, सातबारा /गाव नमुना 8 अ, ही कागदपत्रे घेवून आपल्या जवळच्या नागरी सुविधा केंद्र (सीएससी) येथे नोंदणी करावी असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.