महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी जाहीर केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, बारावीच्या परीक्षेला ११ फेब्रुवारी २०२५ पासून सुरुवात होणार असून, दहावीच्या परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होण्याची शक्यता आहे. अद्याप अधिकृत वेळापत्रक जाहीर झाले नसले तरी, पुढील १५ दिवसांत अंतिम वेळापत्रक जाहीर होईल, असे सांगण्यात आले आहे.
राज्यभरातील पुणे, नागपूर, मुंबई, नाशिक, लातूर, कोकण अशा ९ विभागीय मंडळांच्या माध्यमातून या परीक्षा आयोजित केल्या जातात. या परीक्षा फेब्रुवारीच्या शेवटी आणि मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात संपणार आहेत. बारावीच्या प्रात्यक्षिक, श्रेणी आणि तोंडी परीक्षा २४ जानेवारी ते १० फेब्रुवारी दरम्यान होणार आहेत, तर दहावीच्या प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षा २ फेब्रुवारी ते २० फेब्रुवारी दरम्यान होऊ शकतात.
या परीक्षांचा निकाल मे अखेरीस किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात अपेक्षित आहे. तसंच, जे विद्यार्थी नापास होतील त्यांच्यासाठी जुलै-ऑगस्टमध्ये पुरवणी परीक्षा घेतली जाईल. त्यामुळे विद्यार्थी वेळापत्रकाची प्रतीक्षा करत असून, तयारीसाठी उपलब्ध वेळ योग्य प्रकारे वापरण्याचा सल्ला दिला जात आहे.