कर्जत -आनंदी नारायण कृपा न्यास संचलित श्री समर्थ रामदास स्वामी मठात दरवर्षीप्रमाणे यावर्षीही दासनवमी महोत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला. या वर्षीच्या महोत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे मठ स्थापनेच्या तपपूर्ती निमित्ताने करवीर पीठाचे शंकराचार्य यांच्या पावन उपस्थितीत विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.शंकराचार्य यांच्या पूजन व दर्शन सोहळ्याने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यांच्या हस्ते मठात असलेल्या गोशाळेतील शेण व गोमूत्रापासून उत्पादित वस्तूंचे उद्घाटन करण्यात आले. तसेच, समर्थ मठातील मारुतीच्या मूर्तीसमोर राम मंदिर उभारणीच्या कार्यास त्यांच्या शुभहस्ते आशीर्वाद मिळाला. यावेळी बोलताना शंकराचार्य म्हणाले, “प्रत्येकाने सकारात्मक विचार बाळगल्यास नक्कीच यश प्राप्त होते. तसेच, धर्म टिकून राहिल्यासच तो आपले तारण करेल.” त्यांनी समर्थ पादुकांच्या ऐतिहासिक व शास्त्रीय परीक्षणाच्या उपक्रमाचेही कौतुक केले.यानंतर स. भ. मोहनबुवा रामदासी यांनी आपले विचार मांडताना सांगितले की, शासनाच्या प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत भक्त निवास, गोशाळेची पुनर्बांधणी व रस्ते निर्माण यांसह विविध विकासकामे सुरू असून ती प्रगतीपथावर आहेत. दासनवमीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून हजारो भाविकांनी मोठ्या भक्तिभावाने उत्सवात सहभाग घेतला.कोर हेरिटेज, पुणे संस्थेद्वारे समर्थ पादुका व श्रीराम पंचायतन मूर्तीचे ऐतिहासिक शास्त्रीय परीक्षण करण्यात आले. कोर हेरिटेज या संस्थेचे श्री राकेश धावडे सर पाटील यांच्या उपस्थितीत हे परीक्षण पार पडले. हे पादुका शिवकालीन असल्याचे प्रमाणपत्र करवीर पीठाचे शंकराचार्य यांच्या हस्ते मठाचे कार्यकारी विश्वस्त स. भ. मोहनबुवा रामदासी यांना प्रदान करण्यात आले.उत्सवाच्या निमित्ताने कीर्तन, प्रवचन व गायनसेवा यांसारख्या विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. विशेष आकर्षण ठरला तो आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सनई वादक श्री प्रमोदजी गायकवाड यांच्या बहारदार सनई वादनाचा कार्यक्रम. त्यांच्या सुमधुर वादनाने उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले.२२ फेब्रुवारी रोजी समर्थ भक्त मोहनबुवा रामदासी यांनी समर्थांच्या निर्याण कथनाचा कार्यक्रम संपन्न केला. त्यानंतर मोठ्या संख्येने ग्रामस्थ व भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. २३ फेब्रुवारी रोजी श्रीरामबुवा रामदासी यांनी लळीत कीर्तन सादर केले. महोत्सवाच्या सांगतेला सर्व सेवेकऱ्यांना श्रीफळाचा प्रसाद वाटप करण्यात आला आणि भक्तिमय वातावरणात दासनवमी महोत्सवाची समाप्ती झाली.