[ मोताळा लाईव्ह ] मोताळा तालुक्याचे तहसीलदार हेमंत पाटील यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. वर्ग दोनची जमीन वर्ग एकमध्ये रूपांतरित करून देण्यासाठी २ लाख रुपयांची लाच स्वीकारताना ते अँटी करप्शन विभागाच्या जाळ्यात अडकले. या कारवाईमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.
अँटी करप्शन विभागाच्या पथकाने तहसीलदार पाटील यांच्या राहत्या घरी शोध घेतला असता तब्बल ४ लाख ७५ हजार रुपये रोख रक्कम सापडली. या रकमेसंदर्भात तहसीलदार पाटील कोणतेही समाधानकारक स्पष्टीकरण देऊ शकले नाहीत. त्यामुळे ही रक्कम जप्त करण्यात आली आहे.
प्रकरण उघडकीस आल्यानंतर तहसीलदाराला न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणी दरम्यान सरकारी पक्षाने चौकशीसाठी पोलीस कोठडीची मागणी केली. त्यानुसार न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
या प्रकरणामुळे महसूल विभागातील कारभारावर प्रश्नचिन्ह उभे राहिले असून नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. लाचलुचपत विरोधी विभागाकडून पुढील चौकशी सुरू असून तहसीलदार पाटील यांच्याकडील संपत्ती व आर्थिक व्यवहारांची कसून चौकशी होण्याची शक्यता आहे